साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतील बंडखोर नायक ' वक्ते प्रा डॉ संघप्रकाश दुड्डे
*' साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतील बंडखोर नायक ' वक्ते प्रा डॉ संघप्रकाश दुड्डे
हे वर्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. याचे औचित्य साधून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जन्मशताब्दी महोत्सव समिती, शहर जिल्हा सोलापूर ने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीपासून वर्षभर दर रविवारी सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह व्याख्यानां चे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेतील चौथी पुष्प आज माननीय प्रा.संघप्रकाश दुड्डे यांनी गुंफले.
प्रथमता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मध्यवर्ती जन्मशताब्दी महोत्सव समिती च्या कार्यालयामध्ये मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश आप्पा पाटोळे, माननीय स्वातीताई आवळे (नगरसेविका सोलापूर महानगरपालिका), माननीय समाधान आवळे, माननीय श्री. विजय अडसुळे, माननीय श्री. शिवाजी गायकवाड, माननीय श्री बालाजी घोडके, प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री टी. एस. क्षीरसागर सर , माननीय श्री किशोर जाधव, यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्यवर्ती जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश पाटोळे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये श्री सुरेश पाटोळे यांनी मध्यवर्ती समितीने आयोजित केलेली व्याख्याने समाज बांधवांनी ऐकावी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणावेत आणि विचारांचा प्रसार करावा, असे आवाहन केले.
यानंतर माननीय प्राध्यापक संघप्रकाश दुड्डे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीतील विद्रोही नायक या विषयावर फेसबुक लाईव्ह व्याख्यान देण्यास सुरुवात केली. प्रथमता प्राध्यापक संघप्रकाश दुड्डे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या विचाराचे जागर, लोकांमध्ये विचार परिवर्तनाची दिशा देण्याचे काम मध्यवर्ती समिती करत आहे याबद्दल समितीचे अभिनंदन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या सारखा प्रतिभावंत, गुणी साहित्यकार आपल्याला मराठी साहित्यात शोधून देखील सापडणार नाही. अण्णाभाऊंचे साहित्य जगभरातील 27 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे म्हणून अण्णाभाऊंच्या प्रतिभेला जगात तोड नाही. पोवाडे लोकनाट्य यांना वेगळे अधिष्ठान मिळवून देण्याचे काम अण्णाभाऊंनी केले. अण्णाभाऊ नी जे लिहिलं ते मनोरंजनासाठी लिहिले नाही तर क्रांतीचे बीज निर्माण करण्यासाठी लिहिलं आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटून बंड करायला उभ्या होतात. अण्णा भाऊंनी सुरुवातीला पोवाडे लोकनाट्यातील वग लिहिले परंतु जेव्हा अण्णाभाऊ ना कळले आपल्या समाजाच्या व्यथा वेदना प्रकर्षाने, विस्तृतपणे मांडण्यासाठी हे अपुरे आहे तेव्हा ते कादंबरी या साहित्य प्रकाराकडे वळले. अण्णाभाऊंनी रंजना तून प्रबोधन आणि प्रबोधनातून विश्वनिर्मिती झाली पाहिजे असे आपल्या साहित्यातून मांडले. अण्णाभाऊ मी का लिहितो ? हे स्पष्ट करताना म्हणतात माझ्या समाजातील जुन्या चालीरीती अंधश्रद्धा रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात, द्वेष कलह नष्ट व्हावा. नव महाराष्ट्रामध्ये प्रेम सलोखा याची वाढ व्हावी, जनता संपन्न व्हावी आणि महाराष्ट्रातील विषमता नष्ट व्हावी आणि समाज सत्ता उदयाचा अरुणोदय झालेला पहावा यासाठी मी लिहितो. मराठी साहित्याला अस्पर्शित, बहिष्कृत समाजाचे जीवन दर्शन अतिशय प्रखर शब्दात अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून घडविले आहे. अण्णाभाऊ नी जे जीवन जगले, भोगले , अनुभवले ते नोंदवण्याचे जीवितकार्य केले. अण्णा भाऊंचे साहित्य पुरुषांचे स्वाभिमान, स्त्रीचे चारित्र्य, देशाचे स्वातंत्र्याचे रक्षण करणे या उदात्त हेतूने लिहिलेले गेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमान अण्णा भाऊंच्या कादंबरीतील नायिका मध्ये दिसून येतो. जो कलावंत समाजाच्या दुःखापासून दूर राहतो तो जिवंत साहित्य लिहू शकत नाही असे ठाम मत अण्णाभाऊ साठे यांचे होते. अण्णा भाऊंनी कष्टकरी, दलित, शेतकरी यांना आपल्या कादंबरीत आणले म्हणूनअण्णाभाऊ साठे खऱ्या अर्थाने मुकनायक झाले. अण्णा भाऊंनी आपली विचारधारा कादंबरीतील पात्रांवर लादली नाही, या पात्रांना बदनाम केले नाही तर अजरामर केले. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून नायकत्व दिले ते बहुजन समाजातील माणसांना. अण्णाभाऊंच्या कादंबरीतील नायक कोणताही भेदभाव मानत नाही. कोणत्याही मोहात अडकताना दिसत नाही. ते पलायनवादी वृत्ती स्वीकारत नाहीत. अण्णाभाऊंनी उभे केलेले नायक बलदंड बंडखोर धैर्यशील आणि निधड्या छातीचे ताकतवान आहेत. सुंदर सुशील आणि समाजासाठी आपले जीवन समर्पित करणारे आहेत. ते पराक्रमी आहेत आणि देशासाठी आणि समाजासाठी ते लढतात. अण्णाभाऊ आपल्या नायकांना उदात्ततेचा स्पर्श देतात म्हणून ते आपल्या कायमचे लक्षात राहतात. अण्णाभाऊ व्यक्तिरेखा रेखाटताना जात धर्म पंथ याचा आडपडदा ठेवत नाहीत. प्राध्यापक संघप्रकाश दुड्डे यांनी अण्णा भाऊंच्या कादंबरीतील नायकांचा नामोल्लेख करत ती अन्यायाविरुद्ध कशी संघर्ष करतात याचे वर्णन केले. शेवटी अण्णाभाऊंच्या विचाराचे जागर उभा करत असताना अण्णाभाऊ च्या नावानं विद्यापीठ निर्माण झालं पाहिजे, मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिले पाहिजे ही मागणी जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये आपण करूया तरच आपला संघर्ष पुढे चालू राहील अशी भावना प्राध्यापक संघप्रकाश दुड्डे यांनी व्यक्त केली
आभार किशोर जाधव सर यांनी मानले.
Comments
Post a Comment